नवी दिल्ली, 16 डिसेंबर (पीएसआय)
भारतीय ऑलिंपिक संघाचे प्रमुख विजय कुमार मल्होत्रा यांनी सांगितले की, भोपाळ गॅस दुर्घटनेशी संबंधीत प्रायोजक असल्याने लंडन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सरकारच्या हाती आहे. इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आयओएचे कार्यकारी अध्यक्ष मल्होत्रा म्हणाले की, संस्था डाऊ केमिकल्सला प्रायोजक केल्याच्या निर्णयावर आयोजनकांना फक्त आपला विरोध दर्शवू शकते.
संस्थेच्या कार्यकारिणी आणि सर्वसाधारणसभेच्या बैठकीत मल्होत्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही बहिष्काराबाबत चर्चा केली नाही. बहिष्काराचा निर्णय घेणे सरकारचे काम आहे. ते म्हणाले, आम्ही सरकारला पत्र लिहू की, हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि याबाबत काय कारवाई करता येईल हे आम्हाला सांगितले पाहिजे.
लंडन ऑलिंपिकचे प्रायोजकत्व डाऊला देऊ नये, अशी भारताची इच्छा आहे. कारण डाऊने भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेली यूनियन कार्बाईड कंपनी खरेदी केली आहे. जगातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटनेत हजारो लोकांचा बळी गेला आणि सुमारे 1 लाख लोकांना अजूनही त्याची झळ बसली आहे.
डाऊचे म्हणणे आहे की, यूनियन कार्बाईडने 47 कोटी डॉलर देऊन भारत सरकारबरोबरचा वाद मिटविला आहे. मात्र भारतीय पर्यावरण कार्यकर्ते आणखी भरपाई मागत आहेत.