मुंबई, 13 फेब्रुवारी (पीएसआय)
बॉलीवुड अभिनेता राहुल बोसची चॅरिटेबल संस्था 'इक्वेशन'ने केलेल्या लिलावात महान धावपटू मिल्खा सिंहचे बुट 24 लाख रुपयांत विकले गेले तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट मात्र 11 लाख रुपयात खरेदी करण्यात आली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या एकूण 33 वस्तुचा 'इक्वेशन'च्या कार्यालयात शनिवारी लिलाव झाला. यातून 1.96 कोटी रुपये प्राप्त झाले. या लिलावातील वस्तुंमध्ये सचिन तेंडुलकरची बॅट, मिल्खा सिंहचे बुट आणि अर्जेटीनाचा फुटबॉलपटू लियॉन
मेसीच्या अनेक वस्तूंचा समावेश होता. मिल्खाने 1960 च्या रोम ऑलिंपिकमधील शर्यतीत कांस्य पदक जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली त्यावेळी मिल्खाने हे बुट घातले होते. लिलावतून मिळालेल्या निधीचा भेदभावरहित जग बनविण्यासाठी समर्पित असलेली गैरसरकारी संघटना 'द फाउंडेशन'ला देण्यात आला.
क्रिकेट विश्वकप-2011 मध्ये वापरलेल्या चेंडूचा सर्वाधिक 38 लाख रुपयात लिलाव झाला. या चेंडूवर भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि श्रीलंका संघाचा कर्णधार कुमार संगकारा यांची स्वाक्षरी आहे. दुसऱ्या क्रमांकावर मिल्खाचे बुट राहिले. फिल्मकार राकेश ओमप्रकाश मेहराने ही बोली लावली. लिलावात पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खानची बॅट, न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सर रिचर्ड हेडली यांचा चेंडू, कपिल देव आणि टेनिसपटू राफेल नडाल यांचे बुटदेखील विकले गेले.