सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूवर गेल्या वर्षी बेपत्ता झालेला पट्टा आता परतलाय. दुसरीकडे गुरूच्या पृष्ठभागावर तीन पृथ्वी मावतील एवढे वादळ तयार झाले आहे. याच भागाजवळ असलेला रक्तवर्णी ठिपका आणखी गडद होत असल्याचे दिसून येत आहे. गडद चॉकलेटी रंगाचे पट्टे हे गुरूच्या सौंदर्याचे वैशिष्ट्य मानले जाते. मात्र गेल्या वसंत ऋतूत हा पट्टा अचानक बेपत्ता झाला. साऊथ इक्वेटोरियल बेल्ट असे या पट्ट्याला संबोधले जाते. मात्र तब्बल वर्षभरानंतर बेपत्ता झालेला हा पट्टा आता पुन्हा दिसू लागल्याने गुरूवरही ऋतूचक्र असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. गुरूच्या विषुववृत्ताच्या दक्षिण भागात हा पट्टा दिसू लागला आहे. त्याचा गडद चॉकलेटी रंग हळूहळू पांढरा पडू लागला आहे. या पट्ट्यात झालेल्या बदलाची नोंद घेतल्यानंतर गुरूच्या भोवती फिरणारे वारे आणि ढग यांचा परस्परांशी काय संबंध आहे, याचा उलगडा करता येणार आहे.