सध्यापेक्षा हजारपटीने वेगवान संगणक लवकरच तुमच्या हाती येणार आहे. नेक्स्ट जनरेशनचे हे कॉम्प्युटर ठरणार आहे. स्मार्टफोनमध्येही असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला यश आले आहे. हे वेगवान संगणक 2013 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. आयबीएम व 3 एम कंपनी अशा प्रकारचा संगणक निर्माण करीत आहे. सिलिकॉन चिप्सच्या मदतीने आयबीएमने विशेष तंत्र विकसित केले आहे. त्याद्वारे संगणक व स्मार्टफोनचा वेग हजार पटीने वाढण्यास मदत होणार आहे. या तंत्राचा वापर सध्या अवकाश उद्योगात केला जातो. थ्री डी पॅकेजिंग, सिलिकॉनचे अनेक थर यात असतील, असे या कंपनीचे विपणन व्यवस्थापक माईक बॉमन यांनी सांगितले. स्कायस्क्रॅपर कॉम्प्युटर असे नाव या संशोधन प्रकल्पाला देण्यात आले आहे. सध्याच्या चिप्समध्ये 3 डी ट्रान्झिस्टर्स आहेत. परंतु त्यात 2 डी चिप्स आहेत. त्यामुळे त्यांचे स्वरूप सपाट असे आहे. परंतु आमच्या तंत्रज्ञानामुळे संगणकाचा वेग हजारपटीने वाढणार आहे. याचा फायदा टॅबलेट, स्मार्टफोन यांनाही होणार आहे. आमचे संशोधक यावर अधिक सखोल अभ्यास करीत आहेत. यातून संगणक नवीन स्वरूपात बाजारात येणार आहे, असे आयबीएमचे उपाध्यक्ष बर्नी मेरर्सन यांनी म्हटले आहे. दरम्यान, या तंत्रज्ञानाचे लाँचिग कधी होणार आहे, हे मात्र दोन्ही कंपन्यांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे. परंतु 2013 पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध करून देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.