गुरूची परंपरा असलेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. काळानुरूप या शिक्षकाचं रूपही बदलत गेले. सध्याच्या टेक युगात तर कृत्रिम शिक्षक तयार झाले. ई-लर्निंगच्या माध्यमातून कम्प्युटरच आपला शिक्षक बनला. आता तर चक्क आपल्या खिशातला मोबाइल फोनही आपला शिक्षक बनणार आहे. नजीकच्या काळात मुलांना विविध विषय शिकवणारे मोबाइल ऍप्लिकेशन्स उपलब्ध होणार आहेत. या बाबतीतले सारे संशोधन पूर्ण झाले असून यातले काही ऍप्लिकेशन्स लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत. आयफोन मेकिंग कंपनी ऍपलने नुकतेच आपले ग्रामर ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. यामध्ये इंग्लिश ग्रामर शिकवले जाणार असून त्याचप्रकारे गणित या विषयाचं ऍप्लिकेशनही लवकरच बाजारात येणार आहे. ई-लर्निंगमध्ये आघाडीवर असलेल्या भारतानेही मोबाइल लर्निंग ऍप्लिकेशन्सम ध्ये बाजी मारली आहे. इंग्लिशएज या कंपनीने भारतामध्ये इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी टॅबलेट आणि मोबाइलसाठी विशेष ऍप्लिकेशन तयार केले आहे. यासाठी या कंपनीने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि बीबीसी ऍक्टिव्हशी टायअप केले आहे. आपल्या देशात मोबाइलधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत उत्तम दर्जाचं शिक्षण पोहचावं यासाठी इंग्लिशएजतर्फे या ऍप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषत: भारतीय लोकांची इंग्लिश शिकण्याची गरज लक्षात घेऊन याची निमिर् ती करण्यात आल्याचं इंग्लिशएजचे सीईओ विवेक अग्रवाल सांगतात.