ज्या वयात लोक बाजेवर पडून राहतात त्या वयात ब्रिटनच्या 90 वर्षीय विल्फ कूपरला वेगळाच छंद जडला आहे. ब्रिस्टल शहरात राहणाऱ्या विल्फला कुठे मॅरेथॉन असल्याचे कळताच तो सर्व कामे सोडून तेथे धाव घेतो. जाताना तो पत्नी सिल्वियाला सांगून जातो की, मी मॅरेथॉनमध्ये भाग घेणार नाही. केवळ दुसऱ्या लोकांना पळताना पाहण्याचा आनंद घेईन, पण त्यात भाग घेऊन अर्धी मॅरेथान धावतो. अलीकडेच त्याची ही चोरी पकडली गेली. त्याच्या एका शेजाऱ्याने त्याला टीव्हीवर पळताना पाहिले आणि त्याच्या पत्नीला सांगितले. त्याचे रहस्य उघड झाले तरीही तो थांबण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. त्याला आणखी एका मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे. विल्फ माजी स्पेश बोट सर्व्हिसमॅन आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्याने अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यावेळीही त्याने सिल्वियाला भाग घेणार नसल्याचे सांगितले होते. ही रेस त्याने तीन तास, 11 मिनिटे, 36 सेकंदांत पूर्ण केली होती. या विषयी 90 वर्षीय त्याची पत्नी सिल्विया सांगते की, त्यांच्या स्वास्थ्याविषयी मी नेहमी चिंतेत राहते. 20 वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. एकदा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असता त्यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली होती आणि एकदा त्यांच्या पाठीला जबर मारही लागला होता.