क्टुबा येथील योआंड्री हनेंडेझ गारिडोयांना लोक वेंटीकुआट्रो म्हणजेच चोवीस या नावाने हाक मारतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या हात आणि पायांना सहा-सहा बोटे आहेत. मजेशीर म्हणजे, त्यांच्या एकाही अतिरिक्त बोटाचा आकार बिघडलेला नाही.
37 वर्षीय योआंड्री यांना चोवीस बोटे असल्याचा अभिमान आहे आणि तो याला देवाचा आशीर्वाद समजतो. गुआंटानामो येथील बाराकोआमध्ये ते राहतात. हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे त्यांनी एका पर्यटकाला नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडून दाखविले होते. त्यासाठी त्यांना 10 डॉलर देण्यात आले होते. योआंड्री यांच्याजवळ कोणताच रोजगार नाही. या परिसरामध्ये एका व्यक्तीची सरासरी कमाई 20 डॉलर प्रतिमाह एवढी असते. कुणाच्याही हातात आणि पायामध्ये अतिरिक्त बोटे असणे नवीन नाही. याला वैद्यकीय भाषेत पॉलिडेक्टाइली असे म्हणतात. जर आपण बोटे मोजली नाही तर आपल्याला चोवीस बोटे असल्याचे कळतही नाही, यासाठीच योआंड्रीचे प्रकरण विशेष आहे. त्यांची सर्व अतिरिक्त बोटे एकाच आकाराची आहेत. योआड्री म्हणतात की, ते एकदा क्युबा येथील सुप्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञाला भेटले होते. तेसुध्दा त्यांचा हात पाहून आश्चर्यचकित झाले होते. असे असले तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे हात-पाय सामान्य आहेत. लहानपणी एकदा त्यांच्या शिक्षिकेने त्यांना विचारले की, पाच अधिक पाच किती होतात. त्यावर योआंड्री यांनी कोणतेच उत्तर दिले नाही तेव्हा आपली बोटे मोजून दाखव, असे शिक्षिका त्याला म्हणाली. त्यावर बारा असे योआंड्री याने उत्तर दिले. त्याचे उत्तर त्या चूक ठरवू शकत नव्हत्या.