जपानमधील क्योटो शहरातील ही रेल्वे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या रेल्वेमध्ये अनेक भयानक राक्षस आणि भुते फिरतात; पण घाबरण्याचे कारण नाही, कारण हे खरे राक्षस नसून, तसा वेश धारण केलेली माणसेच असतात. त्यांचे भयानक रूप पाहून मुलांची भंबेरी उडते.
लहान मुले तर रडायला लागून आई-वडिलांना मिठी मारतात. मोठी माणसे मात्र हे राक्षसांकडे पाहून हसतात, मजा घेतात. जपान येथील केईफुकू इलेक्टि-क रेल्वे रोड कंपनीने 2007मध्ये अशा प्रकारच्या रेल्वेची सुरुवात केली होती. या रेल्वेवर अनेक प्रकारच्या राक्षसांची चित्रेही तयार करण्यात आली आहेत. रेल्वेच्या आत निळया रंगाचे लाइट्स लावले जातात. छतावर लटकलेले हात पाहताना भल्याभल्यांची गाळण उडू शकते. ही रेल्वे फक्त ऑगस्ट महिन्यात आराशियामा ते शिजोओमिया या शहरांदरम्यान चालविली जाते. तिचे भाडे 200 येन आहे. जे लोक राक्षस आणि भुताचा वेश करून गाडीत येतात त्यांच्यासाठी फक्त 50 येन भाडे आकारले जाते. पहिल्याच वर्षी ही रेल्वे चर्चेचा विषय ठरली. आता मात्र लोक दरवर्षी ही रेल्वे सुरू होण्याची वाट बघतात.